
नाशिक, 25 डिसेंबर (हिं.स.)। , मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे नाशिकमध्ये प्रो-कबड्डीच्या धर्तीवर जिल्हास्तरीय 'कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. २६ ते २७ डिसेंबर असे दोन दिवस केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर राहणार आहेत, अशी माहिती मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही स्पर्धा १७ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी नॉक आऊट व लिग पद्धतीने व प्रो-कबड्डीच्या नियमांप्रमाणे खेळविण्यात येणार आहे. दि. २४ नोव्हेंबर रोजी केंद्रपातळीवर जिल्हाभरातील एकूण १६ केंद्रांवर तालुकास्तरीय व कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकूण १६ केंद्रांवर प्रत्येकी २६ संघ सहभागी झाले होते. यामध्ये पाच हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यापैकी विजय मिळविलेले मुले आणि मुलींचे मिळून ३२ संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, शशिकांत मोगल, केटीएचएम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे तसेच सर्व समित्यांचे प्रमुख व क्रीडा संचालक, शिक्षक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV