
अकोला, 26 डिसेंबर (हिं.स.)।
विदर्भातील चार महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे महायुतीची मंथन बैठक पार पडली. या बैठकीत अकोला महानगरपालिका निवडणूक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तीन मित्र पक्षांच्या महायुतीतून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुती व्हावी, हीच सर्व कार्यकर्त्यांची एकमुखी जनभावना असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. ८० ते ९० प्रभागांमध्ये आधीच एकमत झाले असून उर्वरित १० ते २० प्रभागांबाबत स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून एक-दोन दिवसांत तोडगा काढण्यात येईल, असे सांगण्यात आले. भाजप हा कार्यकर्ते घडवणारा पक्ष असल्याने कोणतीही नाराजी नसल्याचा दावा भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपला 55, शिंदेंची शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी 10 असं फायनल जागा वाटप होण्याची शक्यता आहे. उद्या किंवा परवापर्यंत अकोल्यातील अंतिम जागा वाटप जाहीर होणार असल्याची माहिती आहे.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रभाग क्रमांक 17 वरुन जोरदार तिढा आहे. या प्रभागात नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले शिंदेंचे महानगरप्रमुख राजेश मिश्रांच्या प्रभागात मैत्रीपूर्ण लढतीवर भाजप ठाम आहे. 2017 मध्ये या प्रभागात स्वत: राजेश मिश्रा, त्यांची पत्नी आणि दोन्ही समर्थक विजयी झाले होते. या सर्वांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश मिश्रा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत 2500 मतं घेतली होती. राजेश मिश्रा यांनी हिंदुत्वादी मते घेतल्याने भाजप उमेदवार विजय अग्रवालांचा 1283 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत राजेश मिश्रांसोबत हातमिळवणी करण्यास अनुत्सुक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे