खोपोली हत्याकांड: भरत गोगावले यांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
रायगड, 26 डिसेंबर (हिं.स.)। खोपोलीत एका नगरसेविकेच्या पतीची हृदयद्रावक हत्या झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट)चे मंत्री भरत गोगावले यांनी या घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. गोगावले म्हणाले की, “अत्य
खोपोली हत्याकांड: भरत गोगावले राष्ट्रवादीवर गंभीर आरोप


रायगड, 26 डिसेंबर (हिं.स.)। खोपोलीत एका नगरसेविकेच्या पतीची हृदयद्रावक हत्या झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट)चे मंत्री भरत गोगावले यांनी या घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

गोगावले म्हणाले की, “अत्यंत दु:खाची बाब आहे की, निवडणुकीचा निकाल २१ तारखेला लागणार आहे, आणि त्याच आठवड्यात या नगरसेविकेच्या पतीची हत्या होणे दुर्दैवी भाग आहे. मला वाटते की, ही घटना राष्ट्रवादी पक्षाच्या दबावामुळे घडली असावी. कारण आमच्या तालुक्यातील पत्नी निवडणुकीत हरवू शकली नाही, आणि त्यामुळे या पक्षाला संताप झाला असावा.” मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, “या सगळ्या खेळामागे राजकीय कारणे आहेत. आमच्या पक्षाचे उमेदवार आणि आम्ही शिवसेना–भाजप एकत्र लढलो होतो, तर राष्ट्रवादी वेगळ्या पद्धतीने लढले होते.

मागच्या निवडणुकीत आमच्या आमदारांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीत सहा ते साडेसहा हजार मतांचा फायदा दिला होता. त्यामुळे हा डाव त्यांनी साधला असावा.” गोगावले यांनी पोलिसांना दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आणि पुढील तपासावर लक्ष ठेवले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. “आता जे कोण असतील, पोलिसांनी त्यांना पकडावे. नंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही पाहू,” असे ते म्हणाले.

सध्या खोपोली पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. राजकीय वर्तुळात ही घटना तणावाचे वातावरण निर्माण करत आहे, आणि स्थानिक नागरिक ही घटना पाहून धक्कादायक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande