
अमरावती, 27 डिसेंबर (हिं.स.)।
स्वातंत्र्यानंतर राष्ट्रानिमिर्तीत सातत्याने योगदान देणाऱ्यापैकी शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख हे एक ‘नेशन बिल्डर’ असून ‘फूड फॉर ऑल’ ची मुहूर्तमेढ भाऊसाहेबांनी रोवली आहे त्यामुळे भाऊसाहेबांनी दाखविलेल्या शाश्वत मार्गाने चालण्याचाच आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले.श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य परिसरात आयोजित शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य समारंभात ते बोलत होते.संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर पद्मभूषण डॉ.विजय भटकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.केंद्रीय आयुष मंत्री ना.प्रतापराव जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.अशोक उईके, शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.पंकज भोयर, राज्यसभा सदस्य खा.डॉ.अनिल बोंडे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, आमदार सौ.सुलभाताई खोडके, आ.परिणय फुके, आ.संजय कुटे, आ.राजेश वानखडे, आ.प्रवीण तायडे, आ.उमेश यावलकर, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, आ.आ.प्रताप अडसड यावेळी अतिथी म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा ‘डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ ना.देवेंद्र फडणवीस यांना पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांच्या हस्ते देण्यात आला.आजपर्यंत मिळालेल्या देशविदेशातील पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार अधिक महत्त्वाचा असल्याचे फडणवीस सटकला उत्तर देताना म्हणाले.आपल्या भाषणातून भाऊसाहेबांच्या कार्याचा समग्र आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की, मानवतेला नाकारणाऱ्या लोकांना नाकारण्याचे काम डॉ.पंजाबराव देशमुख यांनी केले आणि आपल्या कृतीतून व व्यक्तिगत जीवनात त्या विरुद्ध बंड पुकारले. कर्जलवाद बिल आणून शेतकऱ्यांना सावकारी पाशातून बाहेर काढण्याचे काम सर्वप्रथम भाऊसाहेबांनी केले. पहिल्या जागतिक कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून देशविदेशातील तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना करून दिली. ते कृषी क्षेत्रातील सुधारणेचे जनक आहेत.भाऊसाहेबांच्या नावाने असलेल्या पुरस्कारातून मला स्फूर्ती मिळेल म्हणून आपण हा पुरस्कार स्वीकारला असून नवीन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमाने शेतीला कोरडवाहू पासून बागायतीपर्यंत आणण्याचा आपला प्रयत्न आहे व त्यासाठी विविध योजनांवर काम सुरु आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्वच मागण्या आम्ही पूर्ण करणार आहोत सोबतच ना.भोयर यांनी मागणी केल्याप्रमाणे अमरावती येथील शिक्षण विभागाच्या सर्व विभागीय कार्यालयाला मिळून ‘डॉ.पंजाबराव देशमुख’ यांच्या नावाने एकच प्रशासकीय भवन तयार करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या कार्याचा गौरव करून आपल्या उपक्रमाची माहिती दिली व पुरस्कारासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.पंकज भोयर यांचेही यावेळी भाषण झाले.संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुखशिक्षण आणि कृषी या दोन्ही विषयात भाऊसाहेबांच्या विचारांशी बांधिलकी ठेवून संस्था विविध उपक्रम राबवीत आहे असे सांगून कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषणातून संस्थेच्या कार्याची माहिती दिली.विविध पुरस्कारया कार्यक्रमात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.पाच लक्ष रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुख्यमंत्र्यांनी या पुरस्काराची रक्कम संस्थेला भेट दिली. मानपत्राचे वाचन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले.या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील शेलू येथील श्रीमती सुवर्णा अरविंद गावंडे यांना शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्काराने, अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील गोपाल किसनराव येऊल यांना शेतकरी नेते शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्काराने, वाशिम जिल्ह्यातील खरोळा येथील दीपक सुभाष वारकड यांना डॉ.पंजाबराव देशमुख शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे यांनी दिलेल्या दाननिधीतून कस्तुरबा शाळेतील कु.भक्ती गजानन चौधरी हिला ‘डॉ.पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विविध शिष्यवृत्तीडॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील जयश्री प्रवीण चितारे व साक्षी दिलीप सोरते हिला श्रीमती विमलाबाई देशमुख अभ्यासवृत्ती, श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील कु.अश्विनी दीपकसिंग पवार व कु.ऋतुजा भास्कर घोडके, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयातील कु.स्वामिनी महेश धर्माळे व श्री शिवाजी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील कु.पायल राजेंद्र देशमुख हिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली.पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजाननराव पुंडकर, अॅड.जे.व्ही.पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेशदादा खोटरे, प्रा.सुभाष बनसोड, संस्थेचे सचिव डॉ.वि.गो.ठाकरे, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ.अंबादास कुलट, विजय ठोकळ, प्राचार्य डॉ.पी.एस.वायाळ, प्राचार्य अमोल महल्ले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ.मनीष गायकवाड यांनी केले तर कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी आभार मानले.कार्यक्रमाला संस्थेचे आजीव सदस्य, आजी माजी प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी व विदर्भातून आलेले विविध जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी