रत्नागिरीत ऑलिव्ह रिडले कासवांची ७२० अंडी संरक्षित
रत्नागिरी, 28 डिसेंबर, (हिं. स.) : ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीच्या हंगामाला रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७ ठिकाणी प्रत्येकी एक घरटे झाले असून त्यामध्ये ७२० अंडी संरक्षित केली आहेत. मोसमी पाऊस लांबल्यामुळे यावर्षी अंडी घालण्यासाठ
रत्नागिरीत ऑलिव्ह रिडले कासवांची ७२० अंडी संरक्षित


रत्नागिरी, 28 डिसेंबर, (हिं. स.) : ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीच्या हंगामाला रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७ ठिकाणी प्रत्येकी एक घरटे झाले असून त्यामध्ये ७२० अंडी संरक्षित केली आहेत. मोसमी पाऊस लांबल्यामुळे यावर्षी अंडी घालण्यासाठी डिसेंबरमध्ये अपेक्षित कासवे आली नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची गरज जाणवल्यानंतर वन विभाग आणि कांदळवन कक्षामार्फत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कासव संवर्धनाला मोठ्या प्रमाणात सुरवात झाली आहे. या कासवांच्या अंड्यांची पूर्वी तस्करी केली जात होती. काही ठिकाणी अंडी खाद्य म्हणून वन्यप्राणी खात होते. हे प्रकार टाळण्यासाठी त्या त्या समुद्र किनारी असलेल्या गावातील लोकांचे प्रबोधन करून कासव संवर्धनाची जबाबदारी स्थानिकांवर सोपवण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांत ३४ किनाऱ्यांवर कासवांचे संवर्धन केले जात आहे.

यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले घरटे गुहागर किनाऱ्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोंदले गेले. तेथील कासवमित्रांनी अंडी संरक्षित केली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ किनाऱ्यांवर कासवे अंडी घालून गेली आहेत. मात्र हे प्रमाण यंदा कमी असल्याचा अंदाज कासव अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.

यावर्षी पाऊस ऑक्टोबरमध्येही सुरू होता. त्यामुळे समुद्रही खवळलेला होता. अनेकवेळा पाण्याच्या प्रवाहांवर कासवांचे समुद्र किनारी येणे अवलंबून असते. यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे कासवांचा कालावधी पुढे सरकल्याचा अंदाज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande