
नांदेड, 28 डिसेंबर (हिं.स.)।
नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा सायन्स कॉलेजच्या प्रांगणात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थांतर्गत पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूलमधील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नदिड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. दिलीप गवई, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, कार्यकारिणी सदस्य अॅड. सी. बी. दगडिया, कॉ. प्रदीप नागापूरकर, डॉ. कुंजम्मा काब्दे, डॉ. अजीत काब्दे, प्राचार्य लक्ष्मण शिंदे, प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांची उपस्थिती होती.
शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास, संघ भावना, खेळाडू वृत्ती वृद्धिंगत व्हावी, शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आदी स्पर्धांचा समावेश असून, सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल येथे या स्पर्धा रविवार रंगणार आहेत. शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
यावेळी बोलताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन म्हणाले की, नांदेड एज्युकेशन सोसायटी ही गेल्या चार वर्षांपासून आपल्या तीन घटक संस्थांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा संस्थेचे उपाध्यक्ष सी. ए. डॉ. प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करीत आहे. त्यामुळे निश्चितच शिक्षक व कर्मचारी यांच्यामध्ये खेळ भावना वृद्धींगत होत आहे.
प्रास्ताविकात सीए. डॉ. प्रवीण पाटील म्हणाले की, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये फारसा समन्वय असत नाही, ते एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अतिशय पूरक आहे. तसेच आपले हेवेदावे दूर करून एक खेळ भावना निर्माण व्हावी यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis