
नांदेड, 28 डिसेंबर (हिं.स.)।
नांदेड येथे सुरू असलेल्या श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशपर्वला समर्पित अखिल भारतीय श्री गुरू गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात पंजाब पोलीस संघाने प्रथम विजेता पद पटकावले. ऑरेंज सिटी नागपूर संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर तिसऱ्या स्थानावर एमपीटी मुंबई संघ राहिला आहे.
येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर हॉकी स्पर्धा सुरू होती. अंतिम सामन्यात पंजाब पोलीस आणि ऑरेंज सिटी नागपूर संघाने संघर्षपूर्ण खेळाचे प्रदर्शन घडवले. हा सामना पाहण्यासाठी भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू आणि ओलिंपियन हरपालसिंघ नामधारी आवर्जूनपणे उपस्थित होता. या सामन्यात पंजाब पोलीस संघाने नागपूर संघाचा ३ विरुद्ध १ गोल अंतराने पराभव केला. पंजाब पोलीस संघाचे खेळाडू पवनदीपसिंघ याने पहिल्या सत्रात १४ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनाल्टी कॉर्नरमध्ये गोल करत संघाचा खाते उघडले. त्यानंतर एकाच मिनिटाच्या अंतराने करणबीरसिंघ याने मैदानी गोल करत आघाडी निर्माण केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात संघर्षपूर्ण खेळाचे प्रदर्शन झाले, पण गोल होऊ शकले नाही. नागपूर संघाने चौथ्या सत्रात ४७व्या मिनिटाला वेगवान हॉकीचे प्रदर्शन सुरू करत सुरेख मैदानी गोल केले. हा गोल सैफ खान याने केला. खेळाच्या ५६ व्या मिनिटाला पुन्हा पंजाब पोलीस संघाला एक पेनाल्टी
कॉर्नर मिळाले. या संधीचा लाभ उचलत सिमरनजीतसिंघ याने गोल करत विजेतापदावर शिक्कामोर्तब केले.
तिसऱ्या स्थानासाठी खेळण्यात आलेल्या सामन्यात एमपीटी मुंबई संघाने २ विरुद्ध ० गोल अंतराने बीएसएफ जालंधर संघाचा पराभव केला. मुंबई संघाच्या हरिरामा एल. एस. याने खेळाच्या २३ व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नरमध्ये पहिला गोल केला. तर ४३ व्या मिनिटाला व्यंकटेश देवकर याने मैदानी गोल करण्यात यश मिळाले. जालंधर संघाला गोल करता आले नाही.
स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेता ठरलेल्या संघांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले. प्रथम पारितोषिक ट्रॉफी आणि एक लाख रूपये रोख, द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आणि रोख ५१ हजार रूपये. तिसरे पारितोषिक ११ हजार रूपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय हॉकी संघाचे माजी सदस्य आणि ऑलिम्पीयन खेळाडू हरपालसिंघ नामधारी, कॉन्ट्रॅक्टर दीपसिंघ फौजी, जीवीसी ग्रुपचे प्रमुख गंगाप्रसाद तोष्णीवाल, धर्माबाद येथील व्यावसायी सुबोधकांत काकाणी, गुरुद्वारा बोर्डाचे गुरबचनसिंघ प्राचार्य, सहायक अधीक्षक बलविंदरसिंघ फौजी, हॉकी कमिटीचे प्रमुख गुरमीतसिंघ नवाब (डिंपल), धीरज यादव, सुमित मुथा, हॉकी कमिटीचे पदाधिकारी जितेंदरसिंघ खैरा, सर्व कमिटी सदस्य, मान्यवर, खेळाडू उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis