
रत्नागिरी, 28 डिसेंबर, (हिं. स.) : सुशासन सप्ताहानिमित्त पालशेत (ता. गुहागर) महसूल मंडळातर्फे प्रशासन आपल्या गावी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करत फेरफार अदालत घेतली.
या अदालतीमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. यामध्ये ७ वारस नोंदी आणि इतर २ महत्त्वपूर्ण नोंदी अशा एकूण ९ नोंदी घटनास्थळीच प्रमाणित करण्यात आल्या. यामुळे ग्रामस्थांचा वेळ आणि हेलपाटे वाचले आहेत.
यावेळी सरपंच, पोलीस पाटील, महसूल विभागाचे अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शासनाची सेवा थेट लोकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हाच या सुशासन सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे, असे यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी