
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा 2025-26 अंतर्गत विभागीय आत्मचरित्र लेखन स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) येथे पार पडल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरवंड बु., केंद्र सिंगणापूर, तालुका व जिल्हा परभणी येथील शिक्षक खोब्राजी रामकिशन वाळवटे यांच्या आत्मचरित्र लेखनास पाचवा क्रमांक मिळाला असून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विभागीय स्पर्धेत एकूण अकरा स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेची प्रमाणपत्रे डाएटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, स्पर्धा समन्वयक तथा वरिष्ठ अधिव्याख्याता संजय येवते, तसेच परीक्षक डॉ. विशाल तायडे, डॉ. राठोड आणि डॉ. मंजुषा क्षीरसागर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या यशाबद्दल शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने खोब्राजी वाळवटे यांचा सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख जगन्नाथ चव्हाण, फारुखपाशा सय्यद, भारत ठोंबरे, उपस्थित होते. तसेच त्यांच्या या यशाबद्दल परभणीचे गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत आणि दैठणा बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी मुंढे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis