
रत्नागिरी, 29 डिसेंबर, (हिं. स.) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने शेतीशी संबंधित व शेतीपूरक कामातून माखजन (ता. संगमेश्वर) येथील बचत गटांनी गांडुळ खताची निर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे.
माखजन गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी एकत्र येत गांडूळ खत तयार करण्यासाठी बेड तयार केले. या उपक्रमात गावातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे महिलांनी जैविक शेतीला चालना देण्याचा संकल्प केला असून घरगुती ओला कचरा व शेणखत याचा वापर करून सेंद्रिय गांडूळ खत निर्मिती केली जाणार आहे.
गावातील प्रगती ग्रामसंघाच्या पुढाकाराने व स्वयंप्रेरणेने हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी सरपंच महेश बाष्टे यांनी महिलांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, महिलांचा सहभाग ही ग्रामविकासाची खरी ताकद आहे. जैविक खतनिर्मितीमुळे उत्पन्न वाढीबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल.
या उपक्रमामुळे गावात सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन मिळणार असून महिलांना स्वरोजगाराचा ही मार्ग खुला होईल, असा विश्वास ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अशा उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. बाष्टे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी