विजय माल्यासोबतच्या व्हायरल व्हिडिओबद्दल ललित मोदींनी मागितली माफी
नवी दिल्ली , 29 डिसेंबर (हिं.स.)।लंडनमध्ये विजय माल्या यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त थाटामाटात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी स्वतःला आणि विजय माल्या या
विजय माल्यासोबतच्या व्हायरल व्हिडिओबद्दल ललित मोदींनी मागितली माफी


नवी दिल्ली , 29 डिसेंबर (हिं.स.)।लंडनमध्ये विजय माल्या यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त थाटामाटात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी स्वतःला आणि विजय माल्या यांना “भारताचे दोन सर्वात मोठे फरार” असे म्हणताना दिसतात. हे दोघेही हसत-हसत ही टिप्पणी करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांचा संताप उसळला. या प्रकरणावर आता ललित मोदी यांनी सोमवारी ‘एक्स’वर पोस्ट करत माफी मागितली.

ललित मोदी यांनी सोमवारी ‘एक्स’वर लिहिले, “माझ्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, विशेषतः भारतीय सरकारच्या—ज्याबद्दल मला अत्यंत आदर आहे—तर मी त्याबद्दल माफी मागतो. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असा माझा कधीही हेतू नव्हता. पुन्हा एकदा मनापासून माफी.”

या वादावर परराष्ट्र मंत्रालयानेही प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, फरार आरोपींना कायद्याच्या माध्यमातून भारतात परत आणून न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, यासाठी भारत पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यांनी स्पष्ट केले की अनेक देशांशी यासंदर्भात चर्चा सुरू असून प्रक्रिया चालू आहे. या प्रकरणांमध्ये कायदेशीर गुंतागुंत असली तरी सरकार मागे हटणार नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी हे वक्तव्य आले असून त्याचा थेट संदर्भ ललित मोदी आणि विजय माल्या यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान ललित मोदी यांनी विजय माल्या यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते, “भारतामध्ये इंटरनेटवर पुन्हा एकदा खळबळ उडवण्याची वेळ आली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या मित्रा विजय माल्या. लव्ह यू.” या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी प्रतिक्रिया उमटली आणि अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. व्हिडीओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर ललित मोदी यांनी तो डिलीट केला, मात्र वाद काही थांबला नाही.

ललित मोदी आणि विजय माल्या हे दोघेही सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असून भारतात त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. ललित मोदी 2010 मध्ये भारत सोडून गेले. त्यांच्यावर आयपीएलशी संबंधित करचुकवेगिरी, मनी लॉन्डरिंग आणि प्रॉक्सी मालकीचे आरोप आहेत. प्रवर्तन संचालनालयाचा दावा आहे की 2009 मध्ये आयपीएलचे प्रसारण हक्क देताना त्यांनी गैरव्यवहार केला आणि 125 कोटी रुपयांहून अधिक लाच घेतली.

विजय माल्या 2016 मध्ये भारतातून पळून गेले. किंगफिशर एअरलाईन्सचे माजी मालक असलेल्या माल्या यांच्यावर बँक कर्जातील फसवणुकीचे आरोप आहेत. त्यांनी बँकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपये परत न केल्याचा आरोप आहे. 2019 मध्ये त्यांना ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करण्यात आले होते, ज्याला त्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande