
रत्नागिरी, 29 डिसेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे खंडाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये आज पारितोषिक वितरण सभारंभ उत्साहात पार पडला.
खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट ज्युनिअर कॉलेजमध्ये हा कार्यक्रम झाला. ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक पंचायतीतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेतील विजेते असे - तन्वी दीपक सावंत (11 वी सायन्स), पूर्वा प्रकाश बारगुडे (11 वी विज्ञान), तनुजा लक्ष्मण पातये (11 वी विज्ञान). या विद्यार्थिनीना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य शिवाजी जगताप यांचाही शाळेच्या उत्तम सहभागाबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी स्वामी विवेकानंद व ग्राहकतीर्थ बिंधुमाधव जोशी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाध्यक्ष संदेश सावंत यांनी ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हाभर विविध कार्यक्रम घेतल्याचे सांगितले. कोणत्याही क्षेत्रात कोणावर अन्याय झाला, लुबाडणूक झाली किंवा फसगत झाली तर संबंधिताने रीतसर तक्रार करावी, दाद मागावी. ग्राहकाने ग्राहक पंचायतीशी संपर्क साधला तर निश्चितपणे न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक पंचायत वचनबद्ध आहे. सर्वांनी सजग व जागृत राहण्याची खूप गरज आहे. ग्राहक पंचायतीकडे आतापर्यंत तक्रार दाखल केलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे, असेही सावंत म्हणाले.
विद्यार्थी हा देशाचा कणा आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोरच सतत जागृत असले पाहिजे, चौकस असले पाहिजे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. अन्यायाविरुद्ध योग्य त्या ठिकाणी दाद मागायला हवी. स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणारा विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी विवेकानंद यांच्या सकारात्मक ऊर्जात्मक विचारांची आजही देशाला नितांत गरज आहे, असे सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कूलचे मुख्याधापक विलास कोळेकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा ग्राहक पंचायतीचे सचिव आशिष भालेकर, जिल्हा कोषाध्यक्ष दीपक साळवी, पत्रकार उदय महाकाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. जंगम सर यांनी केले. यावेळी सरगर सर, मुसळे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी