
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविणार असून या दोन्ही पक्षाद्वारे जागा वाटपाचा फॉर्मूला निश्चित झाला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांनी दिली.
या महानगरपालिका निवडणूकीच्या माध्यमातून चांगले लोकप्रतिनिधी सत्तेत यावेत व त्यातून महानगराच्या सर्वांगिण विकासा संदर्भात पाऊले पडावीत या उदात्त हेतूने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रित यावयाचा निर्णय घेतला, असे नमूद करीत श्रीमती खान यांनी या दोन्ही पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून निश्चितच प्रत्येक प्रभागात सर्वार्थाने ताकदवान व सर्वसामान्य नागरीकांच्या पसंतीस उतरतील असेच उमेदवार रिंगणात उतरविले जातील, अशी माहिती दिली. यासाठी दोन्ही पक्षाने मिरीट बेसवर आधारितच उमेदवार निवडीचा संकल्प सोडला आहे. तसेच जागा वाटपाच्या फॉर्मूल्यातसुध्दा तोच विचार करीत त्या पध्दतीनेच जागा वाटपही निश्चित केले आहे. उद्या या संदर्भात सर्व गोष्टींची स्पष्टता होईल, आघाडीती उमेदवारांना एबी फॉर्म उपलब्ध केले जातील, असे त्या म्हणाल्या.
या निवडणूका दोन्ही पक्षाने गांभीर्याने लढविण्याचा संकल्प सोडला आहे. शहरवासीयांसमोर एक सक्षम असा पर्याय उभारावा या दृष्टीनेच व्यूहरचना केली आहे. सर्वसामान्य नागरिक निश्चितच या दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीस कौल देतील, असा विश्वासही श्रीमती खान यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis