
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।परभणी महानगरपालिका निवडणूकीत युती केवळ हिंदुत्वाकरीता; सन्मानजनक जागा द्या, तोडगा निश्चित निघणार अशी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी माहिती दिली.
परभणी महानगरपालिका निवडणूकीत हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये या उदात्त हेतूनेच शिवसेना शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीसमोर जागा वाटपा संदर्भात विविध प्रस्ताव समोर ठेवले आहेत. आम्हास सन्मानजनक जागा भाजपाने द्याव्यात, तोडगा निश्चित निघेल, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षातील युती संदर्भात आम्ही चर्चा करीत आहोत, विशेषतः शिवसेना शिंदे गटाने या निवडणूकीत केवळ हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये या उदात्त हेतूपोटीच युती व्हावी असे प्रयत्न सुरु केले आहेत. त्या सकारात्मक भूमिकेतूनच जागा वाटपा संदर्भात प्रत्येक फेर्यांमध्ये भूमिका मांडल्या आहेत. परंतु, दोन-चार जागा संदर्भात तोडगा निघेणासा झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतेमंडळींनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शिवसेना शिंदे गटास सन्मानजनक जागा उपलब्ध केल्यास निश्चितच तोडगा निघेल, असे भरोसे यांनी नमूद केले.
युतीबाबत आम्ही आजही आशावादी आहोत, उद्याही अंतीम क्षणापर्यंत प्रयत्न करु, असा विश्वासही व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis