
नवी दिल्ली, 29 डिसेंबर (हिं.स.)पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात येऊ शकते. २०२६ हे भारतीय संघासाठी एक व्यस्त वर्ष आहे आणि संघ व्यवस्थापन त्यांच्या क्रिकेटपटूंसाठी वर्कलोड व्यवस्थापनाला प्राधान्य देत आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला टी-२० विश्वचषक होणार असल्याने संघ व्यवस्थापनाला त्यांचे दोन वरिष्ठ मर्यादित षटकांचे क्रिकेटपटू पूर्णपणे तंदुरुस्त राहावेत अशी इच्छा आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बुमराह आणि हार्दिक संघाचा भाग आहेत. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आपले विजेतेपद राखण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन सध्या टी-२० सामन्यांना प्राधान्य देत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे.
या मालिकेसाठी ऋषभ पंतची निवड देखील अनिश्चित आहे. जर पंतला संधी मिळाली नाही, तर यष्टीरक्षक इशान किशन किंवा जितेश शर्मासाठी दार उघडू शकते. भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला एकदिवसीय सामना ११ जानेवारी रोजी बडोदा येथे खेळला जाईल, त्यानंतर १४ जानेवारी रोजी राजकोट येथे दुसरा सामना आणि १८ जानेवारी रोजी इंदूर येथे तिसरा एकदिवसीय सामना होईल. त्यानंतर २१ ते ३१ जानेवारी दरम्यान नागपूर, रायपूर, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथे टी-२० मालिका खेळली जाईल.
गेल्या वर्षभरापासून पंड्याच्या काळजीपूर्वक व्यवस्थापनाबद्दल सतत चर्चा होत आहे. फिटनेसच्या समस्यांमुळे हार्दिकने मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. दरम्यान, २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर बुमराह एकदिवसीय सामन्यात खेळलेला नाही आणि सर्व फॉरमॅटमध्ये त्याचे महत्त्व पाहता संघ व्यवस्थापन त्याच्या कामाच्या ताणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पंड्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्यासाठी खेळण्याची अपेक्षा आहे. यामुळे केंद्रीय करारबद्ध खेळाडूंनी देशांतर्गत सामन्यांमध्ये भाग घ्यावा या बीसीसीआयच्या निर्देशांचे पालन होईल. तो ३, ६ आणि ८ जानेवारी रोजी राजकोट येथे होणाऱ्या बडोद्याच्या शेवटच्या तीन लीग सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे