
नाशिक, 3 डिसेंबर (हिं.स.)।
सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग यांना नेपाळ बॉर्डरवरून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे.
5 ऑक्टोबर रोजी गुन्हा घडल्यापासून आरोपी भूषण लोंढे व त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे फरार होते. 15 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश येथे गेल्यानंतर भूषण लोंढे व त्याचा साथीदार तेथे असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पोलिसांचे पथक त्यांना पकडण्यासाठी जात असताना भूषण लोंढेला पोलिसांची चाहूल लागताच, पोलीस अटक करू नये, आपण पोलिसांच्या ताब्यात सापडू नये या कारणामुळे आरोपी राहुल गायकवाड, भूषण लोंढे यांनी राहत्या ठिकाणाहून खाली उडी मारून ते पळून गेले होते. परंतु त्यावेळेस त्याच्या पायास गंभीर दुखापत होऊन पाय फॅक्चर झाला.
गुन्हे शाखा युनिट दोन चे अधिकारी व कर्मचारी भूषण लोंढे व त्याचा साथीदाराचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस हवलदार प्रकाश महाजन यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी हे राजस्थान व उत्तर प्रदेश राज्यात फिरत असल्याची माहिती मिळवली.
ही माहिती त्यांनी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना दिली. वरिष्ठांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते मार्गदर्शन करून एक पथक राजस्थान येथे रवाना केले. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान येथील कोटपूतली जिल्ह्यात जाऊन तांत्रिक विश्लेषण करून अहोरात्र परिश्रम घेत शोध घेतला.
आरोपी त्या ठिकाणी मिळून आले नाही म्हणून मानवी कौशल्याचा वापर करून माहिती घेतली व गोपनीय रित्या माहिती काढली असता भूषण लोंढे व प्रिन्स सिंग हे नेपाळ बॉर्डर जवळ राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवर जाऊन त्यांना छापा मारून ताब्यात घेतले नंतर त्यांना उत्तर प्रदेश न्यायालयात हजर करून त्यांचे ट्रांजिट वॉरंट प्राप्त केले दोन्ही आरोपी त्यांना पुढील कारवाईसाठी नाशिक येथे घेऊन येत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV