
सासू–सुनेच्या नात्याचं हटके रूप अनुभवायला मिळणार
कोल्हापूर, 30 डिसेंबर (हिं.स.)।झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित बहुचर्चित मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ 16 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, सासू–सुनेच्या नात्याचं हटके रूप प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेत्री निर्मिती सावंत, प्रार्थना बेहरे यांनी कोल्हापूरातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे यांची सासू–सुनेची जोडी प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. दोघींची खट्याळ जुगलबंदी, मिश्किल टोमणे, धारदार संवाद आणि भावनिक क्षणांचा सुरेख समतोल पाहायला मिळेल. प्रार्थना बेहरे आधुनिक विचारांची, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून म्हणून तर निर्मिती सावंत पारंपरिक विचारांची, अनुभवसंपन्न आणि ठाम मतांची सासूबाई म्हणून यात बघायला मिळणार आहे.
यावेळी निर्मिती सावंत यांनी
दोन पिढ्या, दोन वेगवेगळ्या विचारधारा आणि दोन कणखर स्त्रियांमधील नात्याचं गोड-तिखट, हलकंफुलकं तरीही अर्थपूर्ण चित्रण हे या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. असे सांगितले.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणाली
समाजात नेहमी म्हटलं जातं, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते,” त्याप्रमाणे एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री का नाही उभी राहू शकत? हाच विचार आणि हीच टॅग लाईन या चित्रपटात मांडण्यात आली आहे. यात नात्यातील अनेक गंमतीजंमतीही पाहायला मिळणार आहेत.
दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले
दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, ''ही कथा आजच्या काळातील सासू-सुनेच्या नात्याची आहे. दोघीही स्वतंत्र विचारांच्या आणि स्वतःच्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे मतभेद, नोकझोक होते, परंतु त्याचवेळी समजूतदारपणा आणि भावनिक नात्याची सुंदर गुंफणही यात दिसते. सासू आणि सून एकमेकींसाठी आधार बनू शकतात, हीच या चित्रपटाची मध्यवर्ती भावना आहे.''
कधी हसवणारी, कधी मनाला भिडणारी आणि आजच्या काळातील सासू–सुनेच्या नात्याचे विविध पदर उलगडणारी ही कथा, दोन पिढ्यांमधील स्त्री–नात्याचं सामर्थ्य अधोरेखित करते. या चित्रपटात जुनी चार मराठी गाणी वेगळ्या स्वरूपात सादर केली आहेत पण ती रिमिक्स नाहीत.
या चित्रपटाचं शीर्षकगीतालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सासू–सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीचा खमंग स्वाद या गाण्यातून रंगतदारपणे मांडण्यात आला आहे. या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा उत्साही आणि दमदार आवाज लाभला आहे. कुणाल–करण यांचं संगीत हे या गाण्याचं खास आकर्षण ठरतं. पारंपरिक ढंग आणि आधुनिक ठेका यांचा सुंदर मिलाफ साधत त्यांनी गाण्याला अशी चाल दिली आहे की, ती पहिल्याच ऐकण्यात लक्षात राहाते. वलय मुलगुंड यांच्या साध्या, बोलक्या आणि लक्षात राहाणाऱ्या शब्दांतून सासू–सुनेच्या नात्यातील आपुलकी आणि मिश्किलता सहजपणे उमटते.
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, सना शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. पटकथा वैशाली नाईक यांची असून, छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar