
नवी दिल्ली , 30 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बीएनपीच्या प्रमुख खालिदा झिया यांचे मंगळवारी सकाळी ढाक्यात निधन झाले असून बुधवारी त्यांना अंतिम निरोप दिला जाईल आणि पूर्ण राजकीय सन्मानाने त्यांचे दफन केले जाणार आहे. या दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्री 31 डिसेंबर रोजी ढाक्यास रवाना होणार आहेत.
खालिदा झिया यांचे मंगळवारी दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, डॉ. एस. जयशंकर हे भारत सरकार आणि भारतातील जनतेचे प्रतिनिधित्व करत खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील, यासाठी ते 31 डिसेंबर रोजी ढाका येथे जाणार आहेत.त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने आपल्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या निधनानंतर मंगळवारी सात दिवसांचा अधिकृत शोक जाहीर केला आहे. बीएनपीचे नयापल्टन येथील केंद्रीय कार्यालय, पक्षाध्यक्षांचे ढाक्यातील गुलशन कार्यालय तसेच जिल्हा कार्यालयांमध्ये शोक पुस्तिका ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून पक्ष सदस्य आणि नागरिक श्रद्धांजली अर्पण करू शकतील.
माजी पंतप्रधानांच्या निधनावर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद यूनुस यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी देशात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला.तसेच दूरदर्शनवरून देशाला उद्देशून दिलेल्या भाषणात मोहम्मद यूनुस यांनी नागरिकांना आवाहन केले की, अंत्यसंस्कार आणि शोककाळात शांतता, शिस्त आणि सुव्यवस्था राखावी. हा काळ संयम राखण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले आणि सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, यावरही त्यांनी भर दिला. यूनुस म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode