
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना
छत्रपती संभाजीनगर, 30 डिसेंबर (हिं.स.)। शेतापर्यंत रस्त्यांची निर्मिती करणारा मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना हा कार्यक्रम आपल्या संपूर्ण विभागात कालबद्ध पद्धतीने राबवून येत्या पावसाळ्याच्या आत विभागात अनेक भागात शेतांपर्यंत रस्ते तयार व्हावेत या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना हा कार्यक्रम राबविण्याबाबत व त्यासाठी सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आज विभागीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, हिंगोलीचे विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच विभागातील सर्व भुमि अभिलेख अधीक्षक, उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. डॉ. अनंत गव्हाणे यांनी सादरीकरण करुन योजनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले की, शेत रस्ते, पाणंद रस्ते मोकळे झाल्याने ग्रामिण भागातील विकासाला गति मिळेल. शेत रस्त्यांबाबत तंटे, वाद कमी होण्यास वा संपुष्टात येण्यास मदत होईल. हे काम राबवितांना त्याचे टप्पे करावे व प्रत्येक टप्प्यावर कालबद्ध कृती करुन रस्ते तयार करण्याचे काम सुरु करावे. जेणेकरुन येत्या पावसाळ्यापर्यंत विभागात अनेक ठिकाणी रस्ते मोकळे व तयार झाले पाहिजे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis