
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)
महानगरपालिका निवडणुकीच्या नामांकन छाननीदरम्यान चार वेगवेगळ्या झोनमध्ये एकूण सात नामांकन अवैध ठरवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक चार नामांकन झोन क्रमांक ४ मध्ये अवैध ठरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,झोन क्रमांक ४ मध्ये एकूण ४ नामांकन अवैध ठरवण्यात आले आहेत.झोन क्रमांक २, ३ आणि ५ मध्ये प्रत्येकी १ नामांकन अपात्र ठरले आहे.झोन क्रमांक ३ मध्ये संगम गुप्ता यांच्या पत्नी राखी गुप्ता यांचे नामांकन रद्द करण्यात आले आहे.झोन क्रमांक २ मध्ये अपक्ष उमेदवार सचिन चरपे यांचे नामांकन अवैध ठरले असून, झोन क्रमांक ५ मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराचे नामांकन अपात्र ठरले आहे.झोन क्रमांक ४ मध्ये सुनीता कोटकर, बाबा माडवकर, रहमत खान बिस्मिल्ला खान आणि हबीब खान रहमत खान यांची नामांकन अपात्र ठरल्याची माहिती आहे.दरम्यान, अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित उमेदवारांना आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतरच नामांकन अवैध किंवा अपात्र ठरल्याबाबतची अधिकृत घोषणा महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नामांकन छाननीतील या घडामोडींमुळे अनेक राजकीय पक्षांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी