
सिन्नर, 31 डिसेंबर (हिं.स.)।
- संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉन मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सिन्नर नगरपालिकेने धडक मोहीम राबवत सहा जणांकडून नायलॉन मांजा जप्त केला. दरम्यान, शहराच्या विविध भागांत नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्या १० जणांना पालिकेच्या पथकाने पकडून त्यांच्याकडील नायलॉन मांजा जप्त केला होता. कारवाईच्या दोन्ही दिवशी नायलॉन मांजासह पतंगबाजी करणाऱ्यांना केवळ समज देण्यात आली. मात्र, सोमवारपासून पतंगबाजी करणाऱ्या मुलांकडे नायलॉन मांजा आढळल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा नगरपालिकेने दिला आहे. पोलिस पथकांना सोबत घेऊन ही कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
दरवर्षी संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजाच्या वापरामुळे अपघात घडत असून, अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना मागील वर्षांत घडल्या आहेत. शहरात नायलॉन मांजाची विक्री व खुलेआम वापर सुरू असताना पालिका आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अभिजीत कदम यांच्या निर्देशानुसार नगरपालिकेच्या पथकांनी शहरात तपासणी मोहीम हाती घेतली. मोहिमेदरम्यान नायलॉन मांजा वापरून पतंग उडवणाऱ्यांकडील रीळ जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे बहुतांश ठिकाणी नायलॉन मांजा लहान मुलांच्या हातातच आढळून आला. त्यामुळे पहिल्या दिवशी कारवाई न करता या मुलांना तसेच त्यांच्या पालकांना केवळ ताकीद देण्यात आली. वैदूवाडी, माकडवाडी, भराडवाडी, जोशीवाडी, काजीपुरा, लोंढे गल्ली, वावीवेस, विजय नगर आदी भागांत ही मोहीम राबवण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV