रत्नागिरी : छात्रालयातील संस्कार शिदोरीमुळेच पुरस्कार - रघुवीर शेलार
रत्नागिरी, 31 डिसेंबर, (हिं. स.) : सर्वोदय छात्रालयातील शिस्तबद्ध नियमित दिनक्रम, शरीरश्रम, स्वावलंबन, सहकार्यशील सहजीवन, मानवतादी दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी ही छात्रालयातील संस्कार शिदोरी घेऊन मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे ट्रस्ट व सामाजिक कार्
रघुवीर शेलार यांचा सकुटुंब सन्मान


रत्नागिरी, 31 डिसेंबर, (हिं. स.) : सर्वोदय छात्रालयातील शिस्तबद्ध नियमित दिनक्रम, शरीरश्रम, स्वावलंबन, सहकार्यशील सहजीवन, मानवतादी दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी ही छात्रालयातील संस्कार शिदोरी घेऊन मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे ट्रस्ट व सामाजिक कार्य चालू ठेवू शकलो, असे प्रतिपादन रघुवीर शेलार यांनी केले.

येथील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे हरिश्‍चंद्र गीते आणि श्रीमती हेमलता गीते पुरस्कृत तिसरा सर्वोदय पुरस्कार श्री. शेलार यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. सर्वोदय छात्रालयाच्या मोरोपंत जोशी सभागृहात हा कार्यक्रम झाला.

श्री. शेलार म्हणाले की, मी व माझे दोन्ही भाऊ सर्वोदय छात्रालयात वास्तव्यास होतो. तेथे राहून शासकीय तंत्रनिकेतनातील विद्युत अभियांत्रिकीतील पदविका प्राप्त केली. सबइंजिनियर पदावरील अ‍ॅप्रेंटिसशिप, सैतवडे आयटीआयमध्ये निदेशक व प्राचार्य, शिरगाव (देवगड) येथे सहाय्यक अधिव्याख्याता, फिनोलेक्समध्ये विद्युत अभियंता अशी पदे भूषवली. रत्नागिरी आयटीआयमधून गिरणीकार व्यवस्थापन (विद्युत) या पदावरून सेवानिवृत्त झालो. शासन, प्रशासनाची सांगड घालून कापडगावात १३ घरांना विद्युतपुरवठा केला. मुंबईतील डॉ. केरोपंत रामचंद्र मजगावकर ट्रस्टशी संपर्क साधून शिवारआंबेरे, यमुनाबाई खेर ट्रस्टसाठी शिक्षणासाठी भरघोस आर्थिक मदत मिळवून दिली. रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघाचे प्रवर्तक, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष या पदांवरून काम करत आहे. आजी व माजी छात्रांच्या छात्र-मित्र मेळाव्यात मदत करतो. याप्रसंगी पत्नी स्वप्नाली, मुलगा श्रेयस, सून सिद्धी व मुलगी श्रुती व कुटुंबीय उपस्थित होते.

पुरस्कारात मिळालेली ६५०० रुपयांची रक्कम आणि त्यात भर घालून ११ हजार ५०० रुपये श्री. शेलार यांनी ट्रस्टला देणगी दिली. कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, विश्वस्त पांडुरंग पेठे, ट्रस्टी बाळकृष्ण शेलार, छात्र समितीचे अध्यक्ष अरुण जाधव, छात्रालयाचे माजी छात्र, पोलिस उपनिरीक्षक अभय तेली आदी उपस्थित होते. सौ. जयश्री बर्वे यांनी मानपत्राचे वाचन केले. सौ. बीना कळंबटे यांनी सूत्रसंचालन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande