
- ग्राहकांनी घाबरून न जाता निश्चित राहावे : शाखा संचालक नंदकिशोर बाहेती
परभणी, 31 डिसेंबर (हिं.स.)।
सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या बूलढाणा अर्बन बँकेची शाखा बंद होणार असल्याची अफवा शहरात पसरल्याने मंगळवारी ग्राहकांनी बँकेत मोठी गर्दी केली. या अफवेच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांनी आपले सोने तारण व ठेवी (डिपॉझिट) परत घेण्यासाठी बँकेकडे धाव घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून सेलू शहरात कार्यरत असलेल्या बूलढाणा अर्बन बँकेच्या या शाखेने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. सोने तारण, ठेवी तसेच इतर बँकिंग सेवांमध्ये विश्वासार्हता राखत या शाखेने आपले लहान रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित केले आहे. मात्र शाखा बंद होणार असल्याच्या निराधार अफवेने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा परिणाम म्हणून बँकेत एकाच वेळी मोठी गर्दी उसळली. या संदर्भात सेलू शाखेचे संचालक नंदकिशोर बाहेती यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, बँक बंद होणार असल्याची बातमी पूर्णपणे अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही. असे काही घडलेले नाही आणि भविष्यातही घडणार नाही. तरीदेखील ग्राहकांनी घाबरून न जाता निश्चित राहावे. ग्राहकांना त्यांच्या पैशांबाबत किंवा व्यवहारांबाबत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शाखा सदैव तत्पर आहे, असे ते म्हणाले. शाखा व्यवस्थापक सुरेश काबराजी यांनीही या अफवांचे खंडन करत सांगितले की, ग्राहकांनी कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नये. बँकेची सर्व कामकाज वेळेत आणि नियमानुसार सुरू आहे. ग्राहकांना आवश्यक असल्यास आपले सोने तारण किंवा ठेवी नेहमीप्रमाणे काढता येतील. मात्र अफवांवर विश्वास न ठेवता बँकेशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. सेलू शाखेचे संचालक विजय बिहाणी यांनी देखील प्रतिक्रिया देताना सांगितले की, सेलू परिसरातील ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. बूलढाणा अर्बन बँकेच्या सेलू शाखेवर नागरिकांनी आजपर्यंत जसा विश्वास ठेवला आहे, तसाच विश्वास भविष्यातही कायम राहील. ग्राहकांचा विश्वास हा आमचा सर्वात मोठा आधार आहे आणि त्याला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही. दरम्यान, बँक प्रशासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, बँकेचे कामकाज नियमितपणे सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis