हायकोर्टाने फेटाळली वाल्मिक कराड विरोधातील ईडी चौकशीची मागणी याचिका
मुंबई, ५ फेब्रुवारी (हिं.स.) : सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे. त्याच्या विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सोबतच न्यायालयाने याचिकाकर्त्याला 20 हजारांचा दंड ठोठा
मुंबई उच्च न्यायालय


मुंबई, ५ फेब्रुवारी (हिं.स.) : सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे. त्याच्या विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सोबतच न्यायालयाने याचिकाकर्त्याला 20 हजारांचा दंड ठोठावला आहे.

संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केली असल्याचा आरोप वारंवार केला जात होता. सर्वच स्तरातून दबाव वाढल्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. पुढे त्यांच्यावर मकोका लावण्यात आला. वाल्मिक कराडने बेकायदेशीर कृत्य करत बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला. त्याची कोट्यवधींची संपत्ती असल्याचेही समोर आले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी वाल्मिक कराडची ईडी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. उलट याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल २० हजारांचा दंड ठोठावला. अखेर तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेण्याचं मान्य केले.

आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी जनहित याचिका दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत केली होती. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात एका कॅबिनेट मंत्र्याचं नाव सातत्यानं येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी मंत्री महोदयांशी संबंधित अनेक कंपन्या आणि मालमत्ता समोर येत असल्यानं याचिकेत निवडणूक आयोगालाही प्रतिवादी करण्यात आले होते. मात्र याचिकाकर्त्यांचा हेतू याचिकेतून स्पष्ट होत नसल्यानं याचिका सुनावणीस योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त करत सुनावणीस नकार दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande