सोलापूर, 5 फेब्रुवारी (हिं.स.)।
यावली (ता. बार्शी) येथे सोनाई दूध डेअरी व सालगुडे आईस्क्रीम युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दूध शीतकरण मशिन, कुल्फी बनवण्याचे मशिन, दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे मशिन, शीतगृह तसेच पशुखाद्य व इतर मशिनरी आणि शेड जळून खाक झाले. यामध्ये त्यांचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचे उद्योजकाचे म्हणणे आहे.
यावली (ता. बार्शी) येथील उद्योजक रामदास हरिदास सालगुडे यांनी मोठ्या जिद्दीने आणि कष्टातून उभा केलेल्या सोनाई दूध डेअरी व सालगुडे आईस्क्रीम युनिटला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे दुपारी एकच्या सुमारास आग लागली. ही आग एवढी भीषण होती, की विझविण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल एक तास लागला.
सालगुडे यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले. तसेच शेजारी असणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या झोपड्याही जळून खाक झाल्या आहेत. गावकऱ्यांकडून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत असून, सालगुडे यांना प्रशासनाकडून मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड