टीटीडीएचे अध्यक्ष नायडूंनी दिले कारवाईचे आदेश
तिरुमला, 05 फेब्रुवारी (हिं.स.) : तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) गैरहिंदू कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाईचा बडगा उचलला आहे. मंदिरात काम करताना इतर धर्मांचे पालन करीत असल्याने या 18 कर्मचाऱ्यांच्या गच्छंतीची तयारी सुरू केली आहे. टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू यांच्या निर्देशानुसार आणि भगवान वेंकटेश्वराचे पावित्र्य लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.
यासंदर्भात टीटीडीने जारी केलेल्या निवेदनानुसार गैर-हिंदू धार्मिक परंपरांचे पालन करणाऱ्या 18 कर्मचाऱ्यांना संस्थेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या पावित्र्याला प्राधान्य देत, संस्थेने या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुपती मंदिरातील उत्सव आणि विधींमध्ये सहभागी होण्यासोबतच, हे कर्मचारी इतर धर्मांच्या धार्मिक परंपरांचे पालन करत होते. बीआर नायडू यांच्या निर्देशानुसार, टीटीडीने अशा कर्मचाऱ्यांसाठी अशी व्यवस्था केली आहे की या लोकांना इतर सरकारी विभागात स्थानांतरित केले जाईल किंवा स्वेच्छा निवृत्ती योजनेअंतर्गत (व्हीआरएस) काढून टाकले जाईल.
मंदिरात नोकरीवर लागताना या कर्मचाऱ्यांनी हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरांचे पालन करण्याची शपथ घेतली होती. परंतु, हे 18 कर्मचारी मंदिराशी संबंधित असूनही गैरहिंदू परंपरांचे पालन करीत असल्याचे आढळून आले आहे. मंदिराचे पावित्र्य आणि हिंदू भाविकांचा आदर करण्यासाठी वचनबद्ध असूनही या कर्मचाऱ्यांनी शपथभंग केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे इतर विभागात स्थानांतरण केले जाईल किंवा त्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सांगितले जाईल असे टीटीडीचे अध्यक्ष बी.आर. नायडूंनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलेय.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी