रत्नागिरी : स्वरवंदना श्रवणीय मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध
रत्नागिरी, 12 मार्च, (हिं. स.) : ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक व पद्मभूषण सी. आर. व्यासांचे गुरु गायनाचार्य (कै.) पं. राजारामबुवा नारायण पराडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित 'स्वर वंदना' मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. महाराष्ट्र शा
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित स्वरवंदना मैफलीत गायन करताना कलाकार.


रत्नागिरी, 12 मार्च, (हिं. स.) : ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक व पद्मभूषण सी. आर. व्यासांचे गुरु गायनाचार्य (कै.) पं. राजारामबुवा नारायण पराडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित 'स्वर वंदना' मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जयेश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम रंगला.

सुरवातीला श्रोत्यांना (कै.) पं. राजारामबुवांच्या आवाजातील देवगिरी बिलावल राग ऐकवण्यात आला. (कै.) राजारामबुवा हे वेरळ (ता. लांजा) गावचे सुपुत्र. या संगीतभूषण कुटुंबाची ओळख व माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना झाली. अतिशय सुरेल आणि दमदार आवाजात काही नवीन गाणी तसेच काही जुनी गाणी नव्या चालीत ऐकायला मिळाली.

स्वरवंदना या शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्यगीत गायनाची श्रोत्यांना मेजवानी मिळाली. साडेचारशे श्रोत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. बऱ्याच दिवसांनी श्रोत्यांना अशी पर्वणी लाभल्याचे अनेक रसिकांनी सांगितले. मैफलीमध्ये (कै.) राजारामबुवांचे चिरंजीव सूरमणि पं. श्रीपाद पराडकर, त्यांची नात सौ. दीपा पराडकर-साठे, नातू पं. ललित पराडकर आणि रत्नागिरीच्या गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्यगीते ऐकवली. हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन, तबलासाथ हेरंब जोगळेकर, पखवाज साथ मंगेश चव्हाण, तालवाद्यसाथ अद्वैत मोरे व निवेदन सौ. दीप्ती कानविंदे यांनी केले. मैफलीचे नियोजन रत्नागिरीतील खल्वायन संस्थेने केले. संचालन व लेखन प्रदीप तेंडुलकर यांनी केले.

सूरमणि पं. श्रीपाद पराडकर यांनी सुरवातीला एक बंदिश सादर केली. सौ. दीपा पराडकर- साठे यांनी आपल्या दमदार आवाजात राग भूपाल तोडीमधील बंदिश, मज भेटुनी जाहो हे भक्तीगीत, का धरीला परदेश हे नाट्यगीत, माझे अछडे बछडे छकुडे, हरी माझा सावळा ही गौळण आणि मैफलीच्या शेवटी (कै.) राजारामबुवा यांची तान बान शरण तुला देवा ही भैरवी सादर केली.

पं. ललित पराडकर यांनी कौशी कानडा रागातील बंदिश, आम्हा न कळे ज्ञान व रूप सावळे सुंदर हे अभंग व भुलविले कृष्णाला ही गीते सादर केली. सौ. मुग्धा भट-सामंत यांनी गोविंद गोविंद, जोहार मायबाप जोहार, योगियां दुर्लभ तो म्या हे अभंग, नयने लाजवित हे नाट्यगीत आणि तुझ्या मनात कुणीतरी लपलंय ग ही गाणी आपल्या सुरेल आवाजात सादर केली.

गायनाचार्य (कै.) पं. राजारामबुवा यांचे चिरंजीव सुरमणि पं. श्रीपाद पराडकर यांच्या हस्ते नटराजपूजन करून प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर सर्व गायक कलावंत व श्रोत्यांच्या प्रतिनिधी म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या सुविद्य पत्नी सौ. नीता सुनील गोसावी या सर्वांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते सर्व गायक, वादक कलावंत, सौ. नीता गोसावी यांचे स्वागत करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक बिभीषण चवरे, सहसंचालक श्रीराम पांडे, कार्यक्रमाधिकारी मिलिंद बिर्जे आणि सहकारी, ध्वनीव्यवस्था उदयराज सावंत, दिलीप केळकर, शैलेश रेडकर, अॅड. राजशेखर मलुष्टे, संगीतप्रेमी रसिकांचे आभार मानण्यात आले. मैफल यशस्वीतेसाठी खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, कार्यवाह प्रदीप तेंडुलकर, खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande