नागपूर, 30 मार्च (हिं.स.) : स्मृती मंदिर भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनशक्ती या मूल्यांना समर्पित आहे. ते आपल्याला सतत राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देते, असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूर, रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसराला भेट देऊन आद्य सरसंघचालक पू. केशव बळीराम हेडगेवार यांचे समाधी स्थळ, तसेच द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिव गोळवलकर यांच्या यज्ञवेदीस्वरूप स्मृतिचिन्हाचे दर्शन घेतले. या दोन महापुरूषांची स्मृती जागविणारे हे स्थळ देशसेवेला समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
यावेळी प्रधानमंत्री यांनी महर्षी व्यास सभागृह, दत्तोपंत ठेंगडी सभागृह व परिसराची पाहणी केली, तसेच उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी