नागपूर, ०२ एप्रिल (हिं.स.) : भारतात कधीही शौर्याची कमतरता कधीच नव्हती. पण, असे असूनही, देशावर सातत्याने परकीय हल्ले होतच राहिले. छत्रपती शिवराय हे या या परकीय आक्रमकांचा उपाय होते असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. शिवचरित्र अभ्यासक व शिवव्याख्याते दिवंगत डॉ.सुमंत टेकाडे लिखीत युगंधर शिवराय या पुस्तकाचे त्यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन झाले. त्यावेळी सरसंघचालक बोलत होते. नागपूरच्या मुंडले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुधोजीराजे भोसले, पुस्तकाचे संपादक डॉ.श्याम माधव धोंड, प्रकाशक सचिन उपाध्याय, दत्ता शिर्के, माधवी टेकाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, अलेक्झांडरच्या काळापासून मुस्लिम आक्रमकांपर्यंत वेळोवेळी भारतावर आक्रमणे झाली आहेत. भारतात कधीही शौर्याची कमतरता भासली नाही. भारतीयांच्या विशाल हृदयात सर्व संस्कृतींसाठी स्थान होते. तसेच आक्रमकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची अद्भुत क्षमताही होती. पण असे असूनही, आपल्या समाजात एक प्रकारचे औदासीन्य निर्माण झाले होते. अनेक वर्षे संघर्ष करूनही, आम्हाला या आक्रमकांना योग्य उत्तर सापडले नव्हते. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आम्हाला योग्य आणि परिपूर्ण उपाय गवसला. आग्र्यात औरंगजेबाच्या तावडीतून मुक्तता झाल्यानंतर छत्रपतींची गाथा संपूर्ण भारतात पसरली. महाराष्ट्रात सुखरूप परतल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केला आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा राज्याभिषेक हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. यामुळे, त्यावेळी भारतात उपस्थित असलेल्या सर्व परदेशी शक्तींना अचूक उत्तर मिळाले. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन बुंदेलखंडात राजा छत्रसालाने स्वतःचे राज्य निर्माण केले. तर राजस्थानमध्ये, दुर्गा प्रसाद राठोड यांनी राजपूतांना एकत्र करून संघर्ष केला. त्यानंतर मुघल पुन्हा कधीही राजपुतानात पाऊल ठेवू शकले नाहीत. त्याचप्रमाणे कूचबिहारचा राजा चक्रधर सिंह यांच्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव होता. चक्रधर सिंहानी दुसऱ्या राजाला लिहीलेल्या पत्रात असे म्हंटले आहे की, आता, आपणही शिवाजी महाराजांप्रमाणे परदेशी आक्रमकांना बंगालच्या समुद्रात बुडवून त्यांचा नाश करू शकतो. असे सरसंघचालकांनी सांगितले.
आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व लढाया माहिती आहे. मात्र त्यामागील नियोजन व व्यवस्थापन जगापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. त्यांचे आरमार, किल्ले, लांब पल्ल्याच्या तोफांसाठीचे तंत्रज्ञान यातून त्यांचे प्रशासन कौशल्य दिसून येत होते. विशेष म्हणजे प्रत्येक बाबतीत देश आत्मनिर्भर व्हावा हे सूत्र त्यांनी देशाला दिले. त्यांच्या कल्पना त्यांनी अस्तित्वात आणल्या, मात्र आपण अद्यापही अनेक कल्पना लागू करू शकलेलो नाहीत असे सरसंघचालक म्हणालेत. शिवाजी महाराजांनी समाजाला आणि देशाला दिलेली प्रेरणा आजही कायम आहे. दिवंगत सुमंत टेकाडेंनी आपल्या कार्यातून छत्रपतींच्या कार्य-कर्तृत्वाचा जागर केला होता. समाजाच्या आणि देशाच्या भल्यासाठी छत्रपतींचे कीर्तन अखंड चालू राहणे आवश्यक असून त्यासाठी सर्वानी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले.
हनुमंत आणि छत्रपती आदर्श
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात व्यक्तीहून विचार श्रेष्ठ मानला जातो त्यामुळे संघ हा तत्त्वांचा उपासक आहे. परंतु, आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवल गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांनी वेगवेगळ्या कालखंडात आणि विविध प्रसंगी असे म्हंटले होते की, जर प्रतिक मानायचेच असेल तर पौराणिक काळातील हनुमान आणि आधुनिक इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आदर्श आहेत असे डॉ. भागवत यांनी सांगितले.-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी