जामनगर, 02 एप्रिल (हिं.स.) : गुजरातच्या जागमनगरमध्ये आज, बुधवारी रात्री भारतीय वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली. जामनगरच्या सुवार्डा गावाबाहेर हा अपघात घडला असून अपघातानंतर विमानाचे तुकडे होऊन परिसरात धुराचे लोट पसरल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यात वैमानिक जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेला आहे आणि त्याच्याभोवती लोकांची गर्दी जमली आहे. तसेच, विमानाचे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले आहेत आणि आग लागल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पायलटला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला. गेल्या महिन्यातही हरियाणातील पंचकुलाजवळ सिस्टीम बिघाडामुळे एक जग्वार लढाऊ विमान कोसळले होते. वैमानिकाने विमानाला गर्दीच्या ठिकाणांपासून सुरक्षितपणे दूर नेण्यात यश मिळवले. हे विमान अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षण उड्डाणासाठी निघाले होते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी