रायगड, 12 एप्रिल (हिं.स.) - आपल्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील तेव्हा आपला देश जगात क्रमांक एकवर असेल, असा संकल्प आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरुन करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजानंतर औरंगजेब आला होता, तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणी, संताजी, धनाजी या सगळ्यांनी लढा दिला आणि त्याची कबर इथेच बांधली गेली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज देशाला आणि जगाला प्रेरणा देणारे आहेत, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
छत्रपती शिवरायांची ३४५ वी पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाचं पूजन करण्यात आले. याशिवाय खासदार उदयनराजे, मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.
शाह पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३४५ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने महाराजांसह राजमाता जिजाऊंना नमन करतो. त्यांनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर बाल शिवाजीला त्यांनी स्वराज्य हा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होतं तिथे मी शिवरायांना अभिवादन केलं. त्यावेळी मनात उचंबळून आलेल्या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. स्वराज्य, स्वधर्म यासाठी त्यांना आयुष्य वेचलं. आदिलशाही, निजामशाहीने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्या वेळी महाराष्ट्र अंध:कारात बुडाला होता. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहे. मात्र असं साहस मी एकाहीमध्ये पाहिलं नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी