दंगलीनंतर मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय पथकांची तैनाती
कोलकाता, 12 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू झालेली हिंसक निदर्शने आता दंगलीत परिवर्तीत झाली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमसेरगंज ब्लॉकच्या जाफराबादमध्ये दंगलखोरांनी पिता-पुत्राची निर्घृण हत्या झाल्याची घटना उजेडात आली आहे. हरगोविंद दास (वय 74) आणि चंदन दास (वय 40) अशी मृतकांची नावे आहेत. दंगलखोरांनी दास यांच्या घरात लूटमार करून त्यांची हत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
मुर्शिदाबादमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, कोलकाता उच्च न्यायालयाने एक मोठा आदेश दिला आहे. मुर्शिदाबादच्या हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी उच्च न्यायालयात मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय सैन्य तैनात करण्याची मागणी केली होती हे ज्ञात आहे. त्यांची मागणी राज्य सरकारने अनावश्यक असल्याचे म्हटले. परंतु उच्च न्यायालयाचे न्या. सौमेन सेन आणि न्या. राजा बसू चौधरी यांच्या दुहेरी खंडपीठाने मुर्शिदाबादच्या जांगीपूरमध्ये केंद्रीय सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले. हिंसाचारादरम्यान आंदोलकांकडून गोळीबारही करण्यात आला.
अतिरिक्त पोलिस महासंचालक जावेद शमीम यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 122 लोकांना अटक करण्यात आली आहे. छापे सुरू राहिल्याने ही संख्या वाढेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी लोकांना सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.
मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद करण्यात आले आहे. कलम 163 (कर्फ्यू) लागू करण्यात आला आहे. मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या दिवशी पुन्हा एकदा वक्फ कायद्यावरून पुन्हा हिंसाचार उसळला. ज्यामध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणात तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसक निषेधात 15 पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी