लखनऊ , 15 एप्रिल (हिं.स.)।लखनौच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघानं बाजी मारली. अखेरच्या पाच षटकात फलंदाजीला येऊन धोनीनं संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. IPL स्पर्धेत ६ वर्षांनी तो 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार विजेता ठरला आहे. मॅच विनिंग कामगिरीसाठी मिळालेल्या पुरस्कारासह त्याने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचलाआहे. एवढेच नाही तर धोनीने किंग कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी साधली आहे.
महेंद्रसिंह धोनीने वयाच्या ४३ व्या वर्षी सामनावीर पुरस्कार पटकवत नवा इतिहास रचला आहे. हा पुरस्कार जिंकणारा तो आयपीएलच्या आतपर्यंतच्या इतिहासातील सर्वात वयस्क खेळाडू आहे. यासह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी केलीये. धोनीने १८ व्या वेळी या पुरस्कारावर आपले नाव कोरले. यासह त्याने कोहली आणि डेविड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी केली. या दोघांनीही प्रत्येकी १८ वेळा सामनावीर पुरस्कार पटकवला आहे. एबी डिव्हिलियर्स याने सर्वाधिक २५ वेळा तर ख्रिस गेलनं २२ वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार पटकवलाय.
या आधी २०१९ च्या हंगामात महेंद्रसिंह धोनीला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. कमालीचा योगायोग हा की, त्यावेळी पंतच्या संघाविरुद्धच त्याने हा पुरस्कार पटकवला होता. फरक एवढाच की, त्यावेळी पंत कॅप्टन्सी करत नव्हता. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात १ मे २०१९ रोजी चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात धोनीने २२ चेंडूत ४४ धावांची दमदार खेळी केली होती. याशिवाय या मॅचमध्ये त्याने दोन स्टंपिंगसह एक कॅच घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode