अहिल्यानगर दि. 9 मे (हिं.स.) :- विद्यापीठाला अधि स्वीकृती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या उपक्रमांची गरज असते. यामध्ये स्पोर्ट्स हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यापीठाच्या संघाने अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश मिळवून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
आचार्य नरेंद्र देव कृषी एव प्रादयोगिक विश्वविद्यालय कुमारगंज, आयोध्या उत्तरप्रदेश येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाने चार सुवर्ण, तीन रजत व तीन कांस्यपदके पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यापीठाच्या संघाने मिळविलेल्या या यशाबद्दल पदव्युत्तर महाविद्यालयाच्या सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते.
यावेळी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. सुनील भणगे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण डॉ. अभिजीत नलावडे, कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण प्रा. रामचंद्र बोरसे, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी,महा विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण डॉ. बाबासाहेब भिंगारदे व विद्यापीठाचे माजी क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. सुनील भणगे व डॉ. अभिजीत नलावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या कबड्डी संघाने (मुले)-सुवर्णपदक, खो-खो (मुले)-सुवर्णपदक, खो-खो (मुली)-सुवर्णपदक, भालाफेक व गोळा फेक यामध्ये अनुक्रमे सुवर्णपदक व रजत पदक वृंदा गांजुरे हिने पटकविले. 800 मीटर धावणे या स्पर्धेत श्रेयस जगदाळे याला रजत पदक तर 4 x 100 मीटर रिले धावणे (मुली)या प्रकारात तन्वी मोरे, प्रणाली काशीद, हर्षाली महाले व प्रतीक्षा मालशिकारे यांनी रजत पदक मिळविले. 5000 मीटर धावणे या प्रकारात ओम पिंपळे याला कांस्यपदक, भालाफेक मध्ये सुशांत केचे याला कांस्यपदक तर 1500 मीटर धावणे या प्रकारामध्ये प्रतीक्षा मालशिकारे हिने कांस्यपदकाची कमाई केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी दिनेश भालेराव यांना महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र शासनाचा गुणवंत संघटक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने श्री. दिनेश भालेराव यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni