मुंबई, 9 मे (हिं.स.) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने इंडियन प्रीमियम लीग चालू हंगाम स्थगित केला आहे.आज (९ मे ) झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.आजपासून आयपीएलचा कोणताही सामना होणार नाही. आता बीसीसीआयची पहिली प्राथमिकता परदेशी खेळाडूंना सुरक्षित त्यांच्या घरी पाठवण्याची आहे. बीसीसीआय लवकरच आयपीएलच्या नवीन तारखा जाहीर करणार आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हंगामातील 58 वा सामना सुरू होता, पण सुरक्षेच्या कारणास्तव सामना थांबवून प्रेक्षकांना स्टेडियम रिकामे करण्यास सांगण्यात आले. अशा युद्धजन्य परिस्थितीत केंद्र सरकार, बीसीसीआय आणि सर्व फ्रँचायझी मालकांशी सल्लामसलत केल्यानंतर IPL स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल रद्द करण्यात आले नाही, म्हणजेच परिस्थिती सामान्य झाल्यानंतर उर्वरित सामने खेळवले जातील. मात्र, हे सामने कधी आणि कुठे खेळवले जातील, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. यापूर्वीही लोकसभा निवडणुकीमुळे 2024 मधील आयपीएलचे सामनेदेखील दोन भागात खेळवण्यात आले होते. पहिला भाग 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान चालला, ज्यामध्ये 21 सामने खेळले गेले. निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर, उर्वरित सामने आणि प्लेऑफचे वेळापत्रक तयार करून खेळवण्यात आले. यामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली आणि कोणतीही अडचण आली नाही. भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले. पण, आधीपासूनच तयारीत असलेल्या भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले परतून लावली अन् पाकिस्तानात घुसून चोख प्रत्युत्तर दिले. रात्री पाकिस्तानने हल्ला सुरू करताच उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. याचा परिणाम आयपीएलवर दिसून आला. त्यामुळे आता आयपीएलचा चालू हंगाम स्थगित केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode