वर्धा, 15 एप्रिल (हिं.स.)।
जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आढावा घेतला. खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्यासोबतच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम व समिती सदस्य उपस्थित होते.
संकुलामध्ये सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा, आगामी काळात करावयाच्या कामाचे नियोजन, समितीकडे असलेल्या जमा खर्चाचा आढावा, सुरू असलेल्या कामाचे देयक अदा करणे, संकुलामध्ये असलेल्या सुविधांचा आढावा, कंत्राटी तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांचे न्यायालयीन प्रकरण, संकुलाकरिता अतिरिक्त जागा मागणी प्रस्ताव व कंत्राटी पद्धतीने वापरण्यास देण्यात येणाऱ्या क्रीडा सुविधांची नियमावली आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
क्रीडा संकुलात कमी असलेल्या सुविधांची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवाल तयार करावा व जिल्हाधिकारी यांना सादर करावा. त्यानुसार सुविधा अद्ययावत करण्यासंबंधी समिती निर्णय घेईल असे पालकमंत्री म्हणाले. जिम्नॅस्टिक खेळाचे साहित्य नाविन्यपूर्ण योजनेत खरेदी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
संकुलात सध्या सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी क्रीडा विभागाची असून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासोबतच संकुलाच्या उत्पन्न वाढीचे स्रोत शोधावे, असे ते म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने