रत्नागिरीतील मुरलीधर मंदिराचे पुजारी वासुदेव सप्रे यांचे मरणोत्तर नेत्रदान, देहदान
रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरीतील मुरलीधर मंदिराचे पुजारी या नात्याने सुमारे ६० वर्षे ईशसेवा केलेल्या वासुदेव बाळकृष्ण सप्रे यांनी मृत्यूनंतरही आपला सेवेचा वसा कायम राखला आहे. १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री वयाच्या ८७व्या वर्षी सप्रे यांचे व
रत्नागिरीतील मुरलीधर मंदिराचे पुजारी वासुदेव सप्रे यांचे मरणोत्तर नेत्रदान, देहदान


रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरीतील मुरलीधर मंदिराचे पुजारी या नात्याने सुमारे ६० वर्षे ईशसेवा केलेल्या वासुदेव बाळकृष्ण सप्रे यांनी मृत्यूनंतरही आपला सेवेचा वसा कायम राखला आहे. १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री वयाच्या ८७व्या वर्षी सप्रे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदानाचा संकल्प केला होता. तो संकल्प त्यांचा मुलगा आणि मुलगी यांनी पूर्ण केला आहे. काल, १७ एप्रिल रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली.

वासुदेव बाळकृष्ण सप्रे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध मुरलीधर मंदिराचे पुजारी म्हणून सुमारे ६० वर्षे कार्य केले. रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशाला आणि गोदूताई जांभेकर विद्यालयात लिपिक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. १६ एप्रिल रोजी रात्री सप्रे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सप्रे यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचे पुत्र हेमंत वासुदेव सप्रे आणि कन्या सौ. संपदा सुनील जायदे यांनी रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आपल्या वडिलांची नेत्रदान प्रकिया पूर्ण केली. त्यानंतर रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात आले. त्याचा उपयोग या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी होणार आहे.

हे महाविद्यालय सुरू झाल्यापासून या महाविद्यालयात झालेले हे पाचवे देहदान आहे. यासाठी समाजसेवक समीर करमरकर आणि विनायक शितूत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, डॉ. मंजूषा रावळ, शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, शिपाई मिहीर लोंढे, तसंच रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांनी काम पाहिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande