अमरावती, 2 एप्रिल (हिं.स.)। अंजनगावसुर्जी पोलिसांनी नवीन बसस्थानकाजवळील परतवाडा रस्त्यावर तांदूळ भरलेला टाटा (एसीई) वाहन (एमएच ४८ टी ५४९२) वाहन पकडले. या वाहनात १९ किंटल ६०० ग्रॅम तांदूळ आढळून आला. संबंधित तांदूळ शासकीय असल्याचा व तो विक्रीसाठी पाठविला जात असल्याचा संशय आहे. संबंधित तांदूळ शासकीय नाही, असे रेटण्याचा जोरदार प्रयत्न पुरवठा विभागाकडून केला जात आहे.
केंद्र सरकार देशभरातील प्रत्येक गरीब कुटुंबाला (८० कोटी लोक) रेशन दुकानांमधून दरमहा ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू मोफत दिला जातो. सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये हा आहे. परंतु काही महाभागांनी त्याचा व्यवसाय उभा केला आहे. ते घरोघरी जाऊन लोकांना रेशन दुकानामधून मोफत मिळालेला तांदूळ कमी किमतीत खरेदी करतात आणि वाहनांमध्ये भरून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी नेतात. यासाठी तांदूळ माफियांचे मोठे नेटवर्क संपूर्ण तालुक्यात पसरलेले आहे. येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा तपासणी अधिकारी रणजित रामाघरे यांच्या निष्काळजीपणा त्याला कारणीभूत असल्याचे काही जाणकार सांगत आहेत. रेशन तांदूळ विकत घेण्याचा व तो बाजारात चढ्या दराने विकण्याचा अवैध व्यवसाय उघडपणे सुरू आहे. मात्र त्याविरुद्ध आतापर्यंत कोणतीही कारवाई न पुरवठा विभागाने केलेली नाही. शहरात माफियांनी दुकाने उघडली आहेत जिथे दररोज खुलेआम रेशनचा तांदूळ खरेदी केला जातो आणि गोदामात साठवला जातो, अशी माहिती आहे. असे असताना अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी रणजित रामाघरे यांच्या वरदहस्ताने हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. परंतु अंजनगावसुर्जी पोलिसांनी सरकारी तांदूळ जप्त करून तांदूळाच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला आहे.परतवाडा येथील माफिया तांदूळ विक्रीसाठी नेत असल्याची माहिती अंजनगाव पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी