अमरावती, 3 एप्रिल (हिं.स.)।
रस्त्याने जाणाऱ्या युवकांना मारहाण करून लुटणाऱ्या एका अल्पवयीनसह चार युवकांना युनिट दोनच्या पथकाने अटक करून मुद्देमाल जप्त केला. परंतु, तीन युवक अद्यापही पसार असल्यामुळे पोलीस त्यांच्या शोधात आहेत. हेमंत ओमकार पेठकर (वय १९ रा. बुधवारा), रोहीत विनोद शेरेकर (वय २०, रा. माता खिड़की), रोहन वासुदेवराव नाईक (वय २४, रा. खडकाडीपुरा) आणि कृष्णा मंगेश कलाने (वय १९, रा. औरगंपुरा) - अशी अटकेतील लुटारुंची नावे आहेत.
बुधवारा परिसरात राहणारा वेदांत गिरीश मानमोडे (वय १९) व त्याचा मित्र संस्कार साहू हे दोघे मोपेड दुचाकीने राजेंद्र गोडे महाविद्यालय जवळून जात होते. तेव्हा चार मोटार सायकलवर ५ ते ६ युवक आले आणि त्यांच्या मोपेड दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. तेव्हा एका युवकाने जवळील चाकू काढून संस्कार साहूवर २ ते ३ वार केले आणि त्याच्या ताब्यातील २ लाख ६० हजार रुपयांचा कॅमेरा हिसकावून निघून गेले. घटनेनंतर वेदांतने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून लुटारूंचा शोध सुरु केला. या प्रकरणात गुन्हेशाखेचे पथकसुध्दा आरोपींच्या शोधात होते. दरम्यान गुन्हेशाखेच्या पथकाला लुटारुंबाबत माहिती मिळताच त्यांनी तीन युवकांना अटक करुन एका अल्पवयीनला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी