पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याचा 'अबीर गुलाल' चित्रपटाची गाणी युट्यूबवरून हटवली
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर यांचा 'अबीर गुलाल' हा चित्रपट येत्या ९ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता.मात्र, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर सरकारने मोठा
Favad  khan


मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर यांचा 'अबीर गुलाल' हा चित्रपट येत्या ९ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता.मात्र, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेत या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनावर बंदी घातली आहे. या दरम्यानच आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या भारतीय युट्यूब चॅनेलवरून 'अबीर गुलाल'ची सगळी गाणी काढून टाकली आहेत.

'अबीर गुलाल'च्या निर्मात्यांनी या चित्रपटाची 'खुदाया इश्क' आणि 'अंग्रेजी रंग रसिया' ही दोन गाणी युट्यूबवर प्रदर्शित केली होती. मात्र, आता ही दोन्ही गाणी युट्यूबवरून हटवण्यात आली आहेत. चित्रपटाचे प्रोडक्शन हाऊस 'अ रिचर लेन्स एंटरटेनमेंट'च्या अधिकृत चॅनेलवरून ही गाणी काढून टाकली गेली आहेत. या चित्रपटाचे अधिकृत संगीत अधिकार खरेदी केलेल्या 'सारेगामा'च्या युट्यूबवरून देखील ही गाणी उडवण्यात आली आहेत. एकीकडे भारतात आतंकवादी हल्ले होते आहेत, तर दुसरीकडे भारत-पाक कलाकारांना एकत्र आणून चित्रपट बनवले जात असल्याने प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियावरचा जनप्रक्षोभ पाहता निर्मात्यांनी हा मोठा निर्णय घेतला. मात्र, यावर अद्याप मेकर्सकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. दरम्यान, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री वाणी कपूर यांच्या 'अबीर गुलाल' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी संपूर्ण देशभरातून होत होती. भारतीय कलाकारांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणे पटत नसल्याचे अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले. अखेर गुरुवारी(दि.२४) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाकिस्तानी अभिनेता फवाद खान स्टारर 'अबीर गुलाल' चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनावर बंदी घातली आहे. याआधी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. मनसेने आधीच इशारा देत, हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे म्हटले होते.

दरम्यान, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पहलगाममध्ये झालेल्या भयानक हल्ल्याची बातमी ऐकून खूप धक्का बसला. या हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना. आम्ही प्रार्थना करतो की, या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला बळ मिळो आणि ते लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडोत, अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande