सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)।
'श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ या घोषात श्री स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. भर उन्हातही महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पहाटे दोन वाजता ‘श्रीं’ची काकड आरती झाली. त्यानंतर वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराकडे अशी नगर प्रदक्षिणात पहाटे तीन ते चार या वेळेत काढण्यात आली. देवस्थानकडून लघुरुद्र अभिषेक सकाळी सहा वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार पुजारी यांच्या मत्रोच्चारात पार पडले.
दरम्यान, पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त वटवृक्ष मंदिरात नित्य अभिषेक बंद करण्यात आले होते. जोतिबा मंडपात सकाळी सात वाजता देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते व सत्संग महिला मंडळच्या सेवा सप्ताहाची समाप्ती करण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता अक्कलकोट राजघराण्याकडून श्रीमंत मालोजीराजे यांच्या हस्ते आरती होऊन ‘श्रीं’ना महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात व भक्तनिवास येथे स्वामी भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड