पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)।
पूर्व प्राथमिक शाळांकडून अवाजवी पद्धतीने आकारल्या जाणाऱ्या प्रवेश शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी, शासनाने सर्वप्रथम नर्सरी शाळांसाठी कठोर अशी नियमावली तयार करून त्याची त्वरित अशी अंमलबजावणी करावी. या नियमाची पायमल्ली करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महापॅरेंट्स पालक संघटनेने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदरच अनधिकृत शाळेची माहिती आपल्या शिक्षण विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातून पालकांना कळविणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदरच प्रसिद्ध करणे आवश्यक आहे, असे मत महापेरेंट्स पालक संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीपसिंग विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु