ठाणे : अखंडित आणि पुरेशा वीज पुरवठ्याचा मार्ग मोकळा
ठाणे, 9 मे (हिं.स.)। ठाणेकरांना अखंडित आणि पुरेसा वीजपुरवठा व्हावा यासाठी आमदार संजय केळकर पाठपुरावा करत असून शहरातील आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आणि सब स्टेशनसाठी महापालिकेकडून दोन आठवड्यात जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली
ठाणे : अखंडित आणि पुरेशा वीज पुरवठ्याचा मार्ग मोकळा


ठाणे, 9 मे (हिं.स.)। ठाणेकरांना अखंडित आणि पुरेसा वीजपुरवठा व्हावा यासाठी आमदार संजय केळकर पाठपुरावा करत असून शहरातील आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आणि सब स्टेशनसाठी महापालिकेकडून दोन आठवड्यात जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांची मुख्यालयात बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, खाते प्रमुख आणि विभागप्रमुख उपस्थित होते. शहरात काही ठिकाणी नागरिकांना नाहक अपुऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसत आहे. ट्रान्सफॉर्मर आणि सब स्टेशनअभावी ही समस्या भेडसावत असल्याने श्री.केळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेतला. सध्या ट्रान्सफॉर्मर आणि इतर यंत्रणा महावितरणला उपलब्ध झाली असली तरी जागे अभावी ती पडून असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. त्यांनी ठामपा मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत जागा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार गावदेवी, हरीनिवास आणि मनोरमानगर भागात दोन ठिकाणी येत्या १५ दिवसांत महापालिका महावितरणला जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.

या बरोबरच सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असली तरी चार्जिंग स्टेशनअभावी या वाहनांच्या खरेदीकडे वाहनचालक पाठ दाखवत आहेत, त्यामुळे केंद्रीय धोरणाला खीळ बसत आहे. या चार्जिंग स्टेशनला देखील जागा देण्याबाबत श्री.केळकर यांनी आग्रह धरला. त्यानुसार शहरात ३० जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

या बैठकीत दक्ष नागरिकांनी अनधिकृत बांधकामांबाबत केलेल्या तक्रारी आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांकडे छायाचित्रांसह सुपूर्द केल्या. भविष्यात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरणार असून संबंधित अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे श्री.केळकर यांनी निदर्शनास आणून दिले. महापालिकेला उच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांत अनधिकृत बांधकामांवरून दोनवेळा दंड सुनावला आहे. यावरून अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची इच्छाच राहिली नसून न्यायालयाच्या शिक्षेची वाट पाहत असल्याची टीका श्री.केळकर यांनी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारीनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.

बैठकीत आमदार संजय केळकर यांच्यासोबत माजी नगरसेवक सुनेश जोशी, संतोष साळवी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते.

*ढोकाळी-कोलशेत मार्ग फेरीवालामुक्त ठेवणार*

रस्ता रुंदीकरणासाठी नागरिकांनी महापालिकेला त्यांच्या जागा दिल्या असताना त्याच जागेवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण कसे होऊ शकते, असा संताप श्री.केळकर यांनी बैठकीत व्यक्त केला. रखडलेल्या ढोकाळी-कोलशेत मार्गाचे काम माझ्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरू झाले असले तरी या मार्गावर फेरीवाल्यांनी बस्तान बसवू नये यासाठी हा रस्ता फेरीवालामुक्त ठेवावा, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली. याबाबत लवकरच नोटिफिकेशन काढण्यात येणार असल्याची त्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande