ठाणे, 9 मे (हिं.स.)। ठाणे महापालिकेला गेल्या १५ वर्षात केंद्र आणि राज्य शासनाकडून तब्बल १६ हजार कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही ठाण्यातील समस्या अजूनही कायम असून ठाण्याचा विकास देखील रखडला आहे.त्यामुळे एवढा निधी खर्च झाला कसा झाला आणि कुठे झाला यासंदर्भात पालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी ठाणे काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. ठाण्यात झालेल्या विकासकामांची पोलखोल करण्यासाठी कासारवडवली ते बीकेसी एमएमआरडीए कार्यालयापर्यंत लॉन्गमार्च काढण्यात येणार असल्याची माहिती ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिकेला गेल्या १५ वर्षात काँग्रेस आणि भाजपच्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून बीएसयुपी आणि स्मार्ट सिटी साठी ४ हजार कोटींचा निधी आला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून साडेसहा हजार कोटी तसेच पालिकेच्या अर्थसंकल्पातील निधी असा एकूण गेल्या १५ वर्षात १६ हजार कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. एवढा कोट्यवधीचा निधी मिळाल्यावर ठाण्याचे शांगय होणे आवश्यक होते. मात्र ठाणे शहरात घकचरा,वाहतूक कोंडी, अनाधिकृत बांधकाम, शाळांची अवस्था, ड्रेनेज, धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर योजना अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. एवढा निधी आला असेल तर हा निधी गेला कुठे? असा प्रश्न विक्रांत चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे प्रत्येक विभागात झालेले काम तपासले गेले पाहिजे , निविदा प्रक्रिया पासून तपासणे गरजेचे आहे, कामे कायदेशीर झाले आहेत का, कामांना विलंब का झाला आहे का , कामाचा दर्जा तपासाला गेला का यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी काँग्रेसच्या माध्यमातून विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. या कामाचे शासनाकडून सर्व जी आर मिळवले आहे. या सर्व कामांची पोलखोल करण्यासाठी१३ मे ला लॉन्ग मार्च काढण्यात येणार आहे. कासारवडवली पासून बीकेसी येथील एमएमआरडीए च्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर