रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात आज रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. रत्नागिरी येथील मध्यवर्ती राम मंदिरात जन्मोत्सवाला मोठी गर्दी झाली होती.
पारंपरिक पद्धतीने रामजन्मोत्सव पार पडला. त्यानिमित्ताने राम आळीमध्ये यात्रा भरली होती. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राम आळीतील वाहतूक आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. सायंकाळी रथयात्राही निघाली. राममंदिरातून निघालेली ही रथयात्रा शहरातून फिरून पुन्हा राम मंदिरामध्ये दाखल झाली.
चिपळूण तालुक्यातील राम वरदायिनी, रत्नागिरीजवळच्या पोमेंडी येथील तसेच पावस येथील राम मंदिर, लांजा येथील राम मंदिर, खेडशी येथील राम मंदिर तसेच जिल्ह्यातील रामाच्या सर्वच मंदिरांमध्ये रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी आजपासून हनुमान जन्मोत्सवापर्यंत विविध कार्यक्रमा आयोजित करण्यात आले आहेत. आज काही मंदिरामध्ये रामावर आधारित विविध देखावे साकारण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी