रत्नागिरी : केळशी गाव जबाबदार पर्यटन ठिकाण घोषित, कांदळवन महोत्सव उत्साहात
रत्नागिरी, 8 एप्रिल, (हिं. स.) : दापोली तालुक्यातील केळशी येथे कांदळवन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी केळशी गाव एक जबाबदार पर्यटन ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्र शासन कांदळवन कक्ष, कांदळवन सहव्यवस्थापन सामिती, केळशी जलस्वर
रत्नागिरी : केळशी गाव जबाबदार पर्यटन ठिकाण घोषित, कांदळवन महोत्सव उत्साहात


रत्नागिरी, 8 एप्रिल, (हिं. स.) : दापोली तालुक्यातील केळशी येथे कांदळवन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी केळशी गाव एक जबाबदार पर्यटन ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले.

महाराष्ट्र शासन कांदळवन कक्ष, कांदळवन सहव्यवस्थापन सामिती, केळशी जलस्वराज्य ग्रामपंचायत आणि मराठमोळी स्वयंसेवी संस्था, कांदळवन कक्षातर्फे हा कार्यक्रम झाला. कांदळवन कक्ष कांदळवने संवर्धन करून त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिकांना उपजीविकेची शाश्वत साधने तयार करण्यास साहाय्य करते. यासाठी कांदळवन कक्षाकडून विविध योजनांचे नियोजन केले जाते. कालवे आणि शिणाण्यांचे दोर, शोभिवंत मासे आणि खेकडेपालन प्रकल्पांबरोबरच गावात पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कांदळवन बोटसफारी, कांदळवन कयाकिंग, कांदळवन सहल आणि तारेदर्शन आदी उपक्रम हाती घेतले जातात. कांदळवन उत्सवात या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती या वेळी देण्यात आली. कांदळवन प्रदर्शन, कांदळवन लघुपट आणि कांदळवन फेरी आदी कार्यक्रमांतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला. आखावे आळी येथील महावीर भवनात पोस्टर व लघुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी गिरीश दातार, अबोली देशपांडे, अपूर्वा कुलकर्णी यांचा झाडांच्या मनात जाऊ ही महाराष्ट्रभर गाजलेली हरितसर्जक सुरेल मैफल झाली.

या वेळी सरपंच श्रेया मांडविलकर, उपसरपंच राजू विद्वांस, दिलीप जाधव, भरत कुळे, सुरेंद्र कद्रेकर, उदय जोशी, अक्षय गुजर, प्रकाश सोनवलकर, मन्सूर परकार, संदीप तळदेवकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande