अमरावती, 9 एप्रिल (हिं.स.)।
क्रीडा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या क्रीडा प्रकारात सहभागी होणाऱ्या दहावी-बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा लाभ दिला जातो. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागतात. अमरावती जिल्ह्यातील दहावी व बारावीतील एकूण १२३७ विद्यार्थ्यांनी ग्रेस गुण मिळविण्यासाठी, आपले ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहे. त्यात दहावीच्या ७६६ व बारावीच्या ४७१ खेळाडूंचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आता खेळांना महत्व दिले जात आहे. त्यामुळे शिक्षणासोबत खेळात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले जात असल्याने, आता विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राचे आकर्षण वाढलेले आहे. अनेक विद्यार्थी हे क्रीडा क्षेत्राकडे वळले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणाऱ्या एकूण गुणांमध्ये ग्रेस गुण समाविष्ट केले जाते. सन २०२३-२४ पर्यंत ही प्रक्रिया ऑफलाइन होती. परंतु २०२४-२५ पासून ग्रेस गुणांसाठी आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने, सर्व अर्ज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपले सरकारमार्फत क्रीडा विभागाला दहावी व बारावी मिळून एकूण १२३७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
४९ क्रीडा प्रकारांमध्ये ग्रेस गुण
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा लाभ मिळण्यासाठी ४९ क्रीडा प्रकारांना मान्यता देण्यात आलेली आहेत. त्यात ऑलिम्पिक, एशियन, कॉमनवेल्थमध्ये समाविष्ट असणा-या खेळ प्रकारात आर्चरी, अॅथलेटिक्स, वेट लिफ्टींग, बॉक्सींग, बास्केटबॉल, सायकलिंग, तलवारबाजी, फुटबॉल, हँडबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस, रायफल शुटिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, जलतरण, कुस्ती, कब्बडी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, नेटबॉल, कराटे, स्कॅश, युशु, नेहरु हॉकी, सुव्रतो फुटबॉल, रग्बी, सेपेक टकारा, मॉर्डन, पेन्टेथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश आहे. तर ऑलिम्पिक, एशियन, कॉमनवेल्थमध्ये समाविष्ट नसणाऱ्या खेळ प्रकारात मल्लखांब, बॉल बॅडमिंटन, बुद्धीबळ, थ्रोबॉल, योगासन, सिकई, डॉजबॉल, टेनिवचाइट, खो-खो, कॅरम, क्रिकेट, रोल स्केटिंग, हॉकी, किक बॉक्सिंग, रोलबॉल, शुटिंग बॉल, आट्या-पाट्या या खेळांचा समावेश आहे. क्रीडा ग्रेस गुण मिळविण्यासाठी अर्जाची मुदत १५ एप्रिलपर्यंत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी