अमरावती, 9 एप्रिल (हिं.स.)शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रशानातर्फे मदत पुरविताना स्वातंर्त्य सैनिकांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही. त्यांना प्रशासनाचे सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.
नियोजन भावनात स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, आणीबाणीतील करावास भोगलेल्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंर्त्य सैनिक मुलायमचंद जैन, कुसुमलता जैन, आणीबाणीतील कारावास भोगलेले मधुसूदन उमेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार प्रशांत पडघन, निलेश कटके, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कटियार म्हणाले, स्वातंत्र्य संग्रामातील सैनिकांचे वय अधिक झाले आहे. त्यामुळे आजच्या शिबिरातून एकाच ठिकाणी विविध तपासण्या करण्यात येत आहेत. तसेच स्वातंत्र्यसैनिकांना आरोग्यविषयक तपासणी त्यांनी सुचविलेल्या ठिकाणी घेता येईल. यासाठी त्यांनी प्रशासनाकडे मागणी करावी. आजच्या शिबिरामधून स्वातंर्त्य सैनिकांना प्रशासनामध्ये येणाऱ्या अडचणी किवा समस्या असल्यास त्या जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकाने प्रशासनाविषयी असलेल्या अपेक्षा या ठिकाणी मांडाव्यात. स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांना योग्य ती मदत देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. आवशयकता भासल्यास स्वातंत्र्य सैनिकांना घरपोच मदत दिली जाईल. आवश्यकता असल्यास आरोग्यविषयक तपासणीचे शिबिर स्वातंर्त्य सैनिकांच्या सोयीने घेतले जाईल. त्यासोबतच जिल्हास्तरावर असलेले विषय तातडीने मार्गी लावण्यात येईल, असेही सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी भटकर यांनी प्रास्ताविकातून आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला. या शिबिराचा सर्वांनी लाभघ्यावा, असे आवाहन केले. जैन यांनी स्वातंर्त्य चळवळी विषयी असलेल्या कवितेतून भावना व्यक्त केल्या. उमेकर यांनी प्रशासन चांगला उपक्रम राबवित असून यासाठी नेहमी सहकार्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जैन, श्रीमती जैन आणि उमेकर यांचा सत्कार करण्यात आला. भावना जिचकर यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगितला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी