अमरावती, 9 एप्रिल (हिं.स.)।
सन २०२४-२५ मध्ये हमीभावाने खरेदी केलेल्या दहा हजार चारशे बावीस क्विंटल सोयाबीनचे पैसे खरेदी विक्री संस्थेकडून थकीत ठेवण्यात आले होते. याबाबत शेतकऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुढधे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर शिवसैनिकांनी खरेदी विक्री संस्थेच्या व्यवस्थापकाला घेराव घातला होता तसेच जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन दिले होते. मात्र शिवसेनेच्या आंदोलक भूमिकेनंतर अखेर खरेदी विक्री संस्थेकडून सर्व सोयाबीन शेतकऱ्यांना चुकारे करण्यास प्रारंभ झाला आहे.
माजी जि प सदस्य तथा शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन हटवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आयोजित बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा थकीत वेतनाचा मुद्दा उपस्थित करून ही गंभीर बाब जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शेतकऱ्यांना जाणवत असलेल्या समस्या देखील त्यांनी मांडल्या. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या खरेदी विक्री संस्थेच्या व्यवस्थापकाला शिवसेनेने धडा शिकविल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी शिवसेनेचे आभार देखील व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी