भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ड्रोन पाडले
नवी दिल्ली, 10 मे (हिं.स.) : भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या 86 तासांपासून सुरू असलेल्या युद्धांला आज, शनिवारी संध्याकाळी 5 वाजता अधिकृत विराम लागला होता. पाकिस्तानच्या पुढाकारावर दोन्ही देश युद्धबंदीसाठी सहमत झाले होते. परंतु, या सहमतीला 4 तास झाल्यानंतर पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करत गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केलेत. भारतीय सैन्याने तत्काळ प्रत्युत्तर देत पाकिस्तानी हल्ले परतवण्यास सुरुवात केली आहे.
कुरापतखोर पाकिस्तानच्या कारवाया पुन्हा एकदा तीव्र झाल्या आहेत. पाकिस्तानने शनिवारी रात्री अनेक भागात युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि जोरदार गोळीबार केला, काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका संशयित ड्रोनचा स्फोटही झाला. तर श्रीनगरमध्ये भारताने 4 पाकिस्तानी ड्रोन पाडले आहेत. पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफखाना डागला आहे. त्याचवेळी बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला झाला आहे. जम्मूच्या पालनवाला सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारताच्या पंजाब, जम्मू-काश्मीर, राजस्थानच्या सीमावर्ती भागात ब्लॅक-आऊट करण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिल्ट्री ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांच्यात दुपारी 3.35 वाजता चर्चा झाली. भारताकडून नकार मिळाल्यानंतर पाकिस्ताने अमेरिकेकडे धाव घेतली. त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात परस्पर सहमतीने युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संध्याकाळी 5 वाजेपासून दोन्ही देशांनी आकाश, जमीन आणि पाण्यातून एकमेकांवर हल्ले करायचे नाही असे ठरले. यासंदर्भात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी अधिकृत माहिती दिली. तसेच सोमवारी 12 मे रोजी दोन्ही देशांचे अधिकारी पुढील रणनीतीवर चर्चा करतील, असे मिस्री यांनी सांगितले होते. त्यानंतर वायुसेनेच्या विंक कमांडर व्योमिका सिंग, सैन्याच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी देखील संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या अपप्रचाराचा भंडाफोड केला. परंतु, रात्र होताच पाकिस्तानने अवघ्या 4 तासात युद्धबंदीचे उल्लंघन करत भारताच्या दिशेने गोळीबार सुरु केला. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मिरात सायरन वाजू लागलेत.
दरम्यान, पाकिस्तानकडून झालेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे. यासंदर्भात अब्दुल्ला म्हणाले की, शांतता कराराचं काय झाले..? श्रीनगरमध्ये स्फोटांचा आवाज - नेमकं चालले तरी काय.. ? असा उद्विग्न सवाल ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटर (एक्स) पोस्टच्या माध्यमातून केला आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी